आयटीआयपर्यंत शिक्षण, शेतात माळावर स्वतःची कंपनी सुरु केली, ऊसतोड मजूराच्या मुलाची गरुडझेप

Rajendra Zadpe

Sep 30, 2024 10:40 am

औरंगाबाद : मराठवाडा म्हटल की मागस आणि शेतकरी आत्महत्या या दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात. याच मराठवाड्यातील तरुण दादासाहेब भगत यांनी स्टार्टअप कंपनी सुरु केली आहे. डु ग्राफिक्स डॉटकॉम असे कंपनीचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग तोट्यात आहेत. त्यांना कंपनी मार्केटिंग व ब्रॅंडिंगसाठी मदत करते. सध्या हे काम मोफत चालू आहे. नंतर पेमेंट आॅप्शनमधून पैसा मिळविला जाईल, असे दादासाहेब यांनी ई-सकाळला सांगितले.

डु ग्राफिक्स डॉटकॉमचे कामकाज बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे सुरु आहे. दादासाहेब यांच्याबरोबर मित्र आणि गावातील काही तरुण काम करित आहेत. पैसे कमविण्यासाठी पुण्यात गेले. येथे इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान कंपनीत त्यांनी नऊ हजारावर कामाला सुरवात केली. कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याविषयी ऐकायला मिळाले. नवीन सॉफ्टवेअरविषयी जाणून घेतले. त्यातून डु ग्राफिक्स डॉटकॉम स्टार्टअप कंपनी सुरु करण्याची प्रेरणी मिळाल्याचे दादासाहेब सांगतात. अगोदर पुण्यातून कंपनीचे काम सुरु होते.

त्यांना कंपनी सुरु करुन तीन वर्षे झाली आहेत. लॉकडाऊनमुळे पुण्यातून आपल्या गावी सावंगी पाटणला आल्यावर येथेच कामाला सुरवात केली. पुण्यातील आयटी पार्कसारख्या सुविधा मिळत नसल्या तरी गावात फ्रेशनेस आहे. पोहण्यासाठी तलाव आहे. स्टार्टअप कंपनीला आम्हाला असच वातावरण उपलब्ध करुन द्या अशी मागणी दादासाहेब करित नाहीत. पुण्यात कंपनीच्या जागेसाठी ७० हजार रुपये भाडे त्यांना मोजावे लागत होते. त्या पैशाची बचत होत असल्याचे ते स्पष्ट करतात. सध्या बरेच काम सुरु आहेत. कंपनीसाठी टीम तयार करताना फेसबुक, परदेशातील ग्राहकांच्या मदतीने टीममध्ये लोक निवडली आहेत. तसेच गावातील तरुणांना रोजगार मिळाला आहे. दादासाहेब यांना लहानपणापासून ड्रॉईंगची आवड होती. यातूनच ते ॲनिमेशनकडे वळले असल्याचे सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेला हातभार लावता येईल या दिशेने त्यांचे काम सुरु आहे.

शिक्षण आयटीआय
ऊसतोड मजूराचा मुलगा असलेल्या दादासाहेब यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एका वर्षाचा कोर्स आयटीआयामधून पूर्ण केला.

भौतिक सुविधांवर जास्त लक्ष
भारतात एखादा उद्योग सुरु करताना जास्त लक्ष कार्यालय व इतर भौतिक सुविधांकडे दिले जातात. त्यामुळे उद्योग प्रत्यक्षात सुरु होत नाहीत, असा अनुभव दादासाहेब भगत यांनी सांगितला. ते म्हणतात, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत एखादी कंपनी सुरु करायचे असेल तर फायनान्सवाले आर्थिक मदतीसाठी उभेच असतात. पण आपल्याकडे असे घडत नाही.

मराठवाड्यातील राजकारणी उदासीन
दादासाहेब यांनी आपल्या छोट्याशा गावात पत्र्यांच्या शेडमध्ये डु ग्राफिक्स डॉटकॉम या सॉफ्टवेअर कंपनीचे काम सुरु केले आहे. पण मराठवाड्यातील एकाही मंत्र्यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली नाही. दुसरीकडे येथील राजकारणी औरंगाबादला आयटी पार्क वगैरे सुरु करु असे सांगतात.मात्र मराठवाड्याच्या मातीतील तरुण उद्योजक दादासाहेब भगत यांच्या प्रयत्नाला शासनाकडून प्रोत्साहन नसल्याचे दिसत आहे.

जे आवडत ते करा
महाविद्यालयात व शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांनी करिअर कसे निवडावे असा प्रश्‍न दादासाहेब यांना विचारला असता, ते म्हणतात ज्याला ज्या क्षेत्राचे आवड आहे त्यात त्यांनी काम करावे.