Rajendra Zadpe
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : विदेशी अॅप्सवर बंदी घालतानाच केंद्र सरकारने आत्मनिर्भरचा नारा दिला. त्यासाठी देशातील सॉफ्टवेअर कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. अशातलीच बीडच्या एका तरुणाची स्टार्टअप कंपनी आहे. कंपनीने पहिलं देशी बनावटीचं ग्राफिक्स डिझाईन सॉफ्टवेअर बनवलंय आहे. मात्र कंपनीचं ना चकाचक ऑफीस आहे, ना काचेच्या केबिन्स.
एका पत्र्याच्या शेडमध्ये, गोठ्यातच सॉफ्टवेअर कंपनी सुरु आहे. ही साधीसुधी कंपनी नव्हे, तर संपूर्ण देशी असलेलं पहिलं वहिलं ग्राफिक्स डिझायनिंग सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी आहे. बीड जिल्ह्यातील सांगवी पाटणच्या दादासाहेब भगत या तरुणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर नाईन्थ मोशन ही कंपनी सुरु केली. लॉकडाऊनमुळे त्यांना पुण्यातून आपली कंपनी गावी हलवावी लागली. इथं त्यांना मॅनपॉवरही मिळाली आणि इतर वेळी जे काम करायला वर्ष लागलं असतं, ते काम २-३ महिन्यांतच पूर्ण झालं.
या गोठ्यामध्येच हा पराक्रम घडलाय, देशातलं पहिलं ग्राफिक्स डिझाईन सॉफ्टवेअर दादासाहेब आणि त्यांचा टीमनं तयार केलं आहे. 'डुग्राफिक्स' हे सॉफ्टवेअर १५ ऑगस्टला लाँच करण्यात आलं आहे. ही खरोखर देशासाठी अभिमानाची बाब आहे. एका छोट्या गावात बसून जगभरातील सुमारे ६ हजार ग्राहकांना दादासाहेबांची टीम हाताळते आहे.
बुद्धिमत्ता असेल, तर काहीच आडवं येऊ शकत नाही, हे दादासाहेब भगत यांनी सिद्ध केलंय. देशातील स्टार्टअपसाठी, अनेक तरुणांसाठी त्यांनी एक उत्तम उदाहरणच घालून दिलं आहे. या कंपनीने २० ते २५ तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. पुढल्या वर्षभरात कंपनीचा विस्तार वाढवून हा आकडा १००० पर्यंत नेण्याचा दादासाहेबांचा मानस आहे.